राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा
प्रकाशन तारीख : 22/02/2022
सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य–एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय राठोड यांनी केले आहे.
“माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पाच प्रकारच्या स्पर्धा होत आहेत यात प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा,गीत स्पर्धा,व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धा यांचा समावेश असून प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२२ ही आहे.
पुरस्कार आणि सन्मान गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये ४ विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी ३ विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.
स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवण्यात याव्यात.
तरी जिल्हातील अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय राठोड यांनी केले आहे.