जालना जिल्‍हा आपले सहर्ष स्‍वागत करीत आहे.

जालना जिल्‍हा  स्‍वतंत्र  भारताच्‍या महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्‍या उत्‍तर दीशेस स्‍थीत आहे. जिल्‍हयाचे अक्षवृत्‍तीय व रेखावृत्‍तीय स्‍थान म्‍हणजे 1901 उत्‍तर ते 2103 उत्‍तर अक्षवृत्‍तीय व 7504 पुर्व ते 7604 पुर्व रेखावृत्‍तीय. जालना जिल्‍हा हा पुर्वी निझाम राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर औरंगाबाद जिल्‍हयामधील एक जालना तालुका झाला.

जालना हा औरंगाबादचा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्‍हा म्‍हणून स्‍थापीत झाला, व औरंगाबाद जिल्‍हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्‍हयातील परतूर असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समावेश करण्‍यात आले. जालना जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा स्थित आहे, औरंगाबाद पश्‍चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्‍तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे.

    जालना जिल्‍हा 7612 चौ.कि.मी. क्षेत्राने व्‍यापलेला आहे, जे राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्‍या तुलनेत 2.47 % एवढा आहे. जालना जिल्‍हयाचे मुख्‍यालय जालना असून राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील राज्‍य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्‍हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्‍द असून स्‍टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील राज्‍यामध्‍ये जालना जिल्‍हा प्रसिध्‍द आहे.

    जालना जिल्‍हयातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामामध्‍ये महत्‍वाची भूमीका पार पाडली होती. श्री जनार्धन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली

श्री राजुरेश्वर गणपती

राजुर,ता.भोकरदन

स्थान व भौगोलिक परिस्थिती

भौगोलिकद्ष्टया जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते. जालना जिल्हा 19.1 ते 20.3 या उत्तर अक्षांश व 75.4 रेखांश  ते 76.4  या पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे.  जिल्हयाचे स्थान राज्यात साधारणपणे मध्यभागी आहे. जिल्हयाच्या उत्तर सीमेवर जळगाव, पुर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेकडे बीड, व पश्चिमेकडे औरंगाबाद हे जिल्हे वसलेले आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 2.51 % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 1.32 % म्हणजे 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले 98.68 % म्हणजे 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्हयात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण 8 तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिल करीता दोन उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना व परतूर येथे आहे. जालना उपविभागांतर्गत जालना, बदनापूर , भोकरदन व जाफ्राबाद तहसिल असून, परतूर विभागात परतूर, अंबड, घनसावंगी व मंठा तहसिल येतात. प्रत्येक तहसिलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली (8) पंचायत समित्या  कार्यरत आहेत.

जनगणना 2011 नुसार जिल्हयात एकूण 971 गावे असून त्यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्हयात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत.  जिल्हयात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नागरी विभाग नसल्याने नगरपरिषदा नाहीत. जालना नगरपरिषद 'अ' वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा 'क' वर्गीय आहेत. जालना जिल्हयात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा  या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती  कार्यरत आहे. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत.

नदी नाले

        जिल्हयाच्या दक्षिण सिमेलगत गोदावरी नदी अंदाजे 60 कि.मी. इतकी जिल्हयातुन वाहते. त्यामुळे जिल्हयाचा दक्षिण भाग गोदावरीच्या खो-यात मोडतो.   दुधना  व  गल्हाटी या गोदावरीच्या उपनदया मध्य भागातून  तर  उत्तर भागातून पुर्णा,  खेळणा  व  गिरजा  या उपनदया वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातुन वाहते.

जमिनीचा प्रकार

      जिल्हयातील    जिल्हयातील जमीन सुपीक व काळी असूुन कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापुर, भाेंकरदन व जाफ्राबाद या तहसीलमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्हयाच्या दक्षिण व दक्षिणपुर्व भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापुस व रब्बीचे पिके चांगल्या प्रमाणात येतात. जिल्हयाच्या उत्तर भागाात विहीरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमीनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असुन भुगर्भातील पाणी अपु-या प्रमाणात आढळते ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.


वने

     जिल्हयात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असूुन उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, औरंगाबाद, याचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्हयातील जंगलव्याप्त क्षेत्र 101.18 चौ.कि.मी. आहे. एकूण भौगोलीक क्षेत्राच्या ते 1.31 % येते. महाराष्ट्र राज्यात 5214 हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असुन त्याची भौगोलीक क्षेत्राची  टक्केवारी 16.95 % आहे. राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्हयाच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त 0.12 % येते. यावरुन जिल्हयातील जंगलव्याप्त क्षेत्र खुपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमीनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे.

पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र साधारणपणे 33 % असणे आवश्यक आहे.  जिल्हयातील वनक्षेत्र अतिशय कमी आहे.

विद्युत निर्मिती, विद्युत पुरवठा, व विजेचा वापर

विद्युत निर्मितीचा एकही प्रकल्प या जिल्हयात नाही. राज्य विद्युत मंडळामार्फत कोयना, पारस, परळी  अशा नजीकच्या प्रकल्पापासुन वीज पुरवठा केला जातो. जिल्हयात चारही शहरांचे विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. जिल्हयात 100 % विद्युतीकरणामुळे वीजेची मागणी वाढत असुन, या वर्षाच्या अखेरपर्यंत 227000 कनेक्शन देण्यात आले आहे.

खाणी व कारखाने

जिल्हयात  एकूण 116 नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या 2667 इतकी आहे. त्यापैकी 14 कारखाने बंद आहेत. 2008 मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या 165 होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी 20 चालु कारखाने असुन त्यात 229 कामगार आहेत. मुलभुत लोह व पोलाद चे उत्पादन करणारे 34 चालु कारखाने असुन त्यात 1519 कामगार आहेत.  जिल्हयातील चालु कारखान्यातुन 2008 वर्षात कामगारांनी काम केलेल्या श्रमदिनाची संख्या 4.73 लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे.

आर्थिक गणना

          1998 नंतर आर्थिक गणना 2005 मध्ये घेण्यात आली.  1998 च्या गणनेनुसार  जिल्हयात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण 40,477 उद्योग आहेत. त्यापैकी 29,830 स्वयंकार्यरत उद्योग तर 10,647 आस्थापना होत्या. 2005 च्या गणनेनुसार जिल्हयात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण 60,183 उद्योग आहेत. त्यापैकी 35,848 स्वयंकार्यरत उद्योग तर 24,335 आस्थापना आहेत. मालकीच्या प्रकारानुसार सर्वात जास्त म्हणजे 55,328 खाजगी, 4,377 सार्वजनिक व 478 सहकारी उद्योग आहेत.  खाजगी उद्योगाची एकूण उद्योगाशी टक्केवारी 91.92 % येते.  या उद्योगापैकी 44,350 (73.68 %) ग्रामीण तर 15,833 (26.32 %) नागरी भागात आहेत.  अनुसुचित जाती, जमातीच्या लोकांची उद्योगाचे मालक म्हणुन एकूण संस्थेची टक्केवारी अनुक्रमे 7.44 व 3.90 येते. जागेविरहीत कार्यान्वित असलेल्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी 30.53 आहे. शक्तीवर चालणा-या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी 12.54 येते. जिल्हयात या गणनेनुसार 1,67,920 कामगार आहेत. त्यापैकी 94,295 (56.15 %) वेतनावर काम करणारे आहेत. प्रती आस्थापना कामगारांची सरासरी संख्या 7 आहे. जिल्हयात दर लाख लोकसंख्येमागे आस्थापनांची संख्या 1510 आहे.

शिक्षणाच्या सोयी

         जालना जिल्हयात 1589 प्राथमिक 217 माध्यमिक व 30 उच्च माध्यमिक शाळा होत्या  त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत. दर लाख लोकसंख्येमागे 99 प्राथमिक  तर 15 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष 2009-10 मध्ये जिल्हयात 42 महाविद्यालये असुन त्यातील विद्यार्थ्यांची संख्या 9354 आहे. एकूण 407829 विद्यार्थ्यांपैकी 57.64 % विद्यार्थी प्राथमिक शाळेत, 39.91 % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत तर उर्वरीत 2.45 % विद्यार्थी महाविद्यालयात आहेत.  जिल्हयासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण 34 आहे, व माध्यमिक शाळांमधील  प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण 34 आहे.
 

वैद्यकीय व आरोग्य सेवा

         जिल्हयातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खाजगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्हयात 12 रुग्णालये, 12 दवाखाने व 40 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधुन 1163 खाटांची सोय उपलब्ध होती. त्यात 72100 आंतर रुग्ण व 740300 बाहय रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना  यांचे  अंतर्गत 8 ग्रामीण रुग्णालये आहेत. 40 प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. 1,47,000 लोकसंख्येसाठी 1 रुग्णालय तर 40324 ग्रामीण लोकसंख्येमागे 1 प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे 72 खाटा  असे प्रमाण आढळते.

धार्मिक स्थळे व पर्यटन -

         जालना जिल्हयात महत्वाची/प्रसिध्द पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत.  जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिघ्द असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास 400 वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा म्दंग तसेच वेणूबाईचा तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाडयातील अष्टविनायकापैकी एक गणपती राजुर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही  आहे.  हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही आहेत.  शिवाय रऊनापराडा ता.  अंबड येथे प्रसिध्द दर्गा असुन तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो.